काल दिवसभरात देशात 35 हजार कोरोनाबाधितांची नोंद, तर 260 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेला चढ-उतार जरी दिसत असला, तरी कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही 30 ते 40 हजारांच्या आसपास वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 34 हजार 976 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 260 जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच मागील 24 तासात 37,681 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान काल एकाच दिवसात देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही जवळपास तीन हजारांनी कमी झाली.

कोरोनाचा केरळमध्ये झालेला प्रकोप नियंत्रणात येताना दिसत नाही. कारण काल दिवसभरात केरळमध्ये 26 हजार 200 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर 125 जणांचा मृत्यू झाला.

काल दिवसभरात महाराष्ट्रात 4,219 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 55 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. तसेच 2 हजार 538 जण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 95 हजार 236 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 04 टक्के आहे.

तसेच काल दिवसभरात मुंबईत 458 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,25,581 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4010 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1206 दिवसांवर गेला आहे.