मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी आज भवानीपूरमधून उमेदवारी अर्ज भरणार ममता बॅनर्जी


कोलकाता : आज भवानीपूर या आपल्या बालेकिल्ल्यातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 30 सप्टेंबरला भवानीपूर विधानसभा मतदारसंघासातील पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. दुपारी 12.30 वाजता ममता बॅनर्जी या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांना जर बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर कायम रहायचे असेल, तर त्यांना ही निवडणूक जिंकणे गरजेचे आहे.

2 मे रोजी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. तृणमूल काँग्रेसला यामध्ये घवघवीत यश मिळाले असले, तरी नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांना पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतरही ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या ममता बॅनर्जी या विधानसभेच्या सदस्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर सहा महिन्याच्या आत त्यांना विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे.

आता ममता बॅनर्जी यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकवण्यासाठी आपल्या पारंपरिक मतदारसंघाचा, भवानीपूरचा आधार घेतला असून या ठिकाणचे आमदार सोभन देव चटोपाध्याय आता खरदाह विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी या आधी भवानीपुरातून दोन वेळा विजय प्राप्त केला आहे. भवानीपूर सोबतच शमशेरजंग आणि जंगीपूर या जागांसाठी 30 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीसाठी काही नियम व अटी लागू केल्या आहेत. केवळ 50 टक्के लोकांचा प्रचारासाठी सहभाग असेल, केवळ 20 स्टार प्रचारक प्रचार करतील आणि मतदानच्या 72 तास आधी प्रचार संपेल, असे नियम निवडणूक आयोगाने घालून दिले आहे