कोरोनाच्या भीतीपोटी भारतीय संघातील अनेक खेळाडूंचा मैदानात उतरण्यास नकार?


लंडन – भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची कोरोना टेस्टे पॉझिटिव्ह आल्यामुळे आजपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यावर अनिश्चिततेचे सावट पसरले होते. पण संघातील सर्व खेळाडूंच्या कोरोना (आरटी-पीसीआर) चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह मिळाल्यामुळे सामना होण्याची शक्यता बळावली आहे. पण आता कोरोनाच्या सावटाखाली असणाऱ्या भारतीय संघालाच हा सामना खेळण्यामध्ये फारसा रस नसल्याची माहिती समोर येत आहे.

या सामन्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाकडून (ईसीबी) हिरवा कंदील देण्यात आला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये सर्व भारतीय खेळाडू कोरोना निगेटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले असले तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ या कसोटीबद्दल साशंक आहे. भारतीय संघातील खेळाडूंची गुरुवारी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये संघातील अनेक खेळाडूंनी पाचवा कसोटी सामना न खेळण्याच्या बाजूने मत नोंदवले.

सुत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रिमियर लिगचे उर्वरित पर्व खेळवले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडूंनी प्रादुर्भावाच्या भीतीने खेळण्याबद्दल फारसा उत्साही नसल्याचे म्हटले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेले फिजिओ परमार हे रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शामी, इशांत शर्मा यासारख्या खेळाडूंसोबत काम करत होते. सोमवारी संपलेल्या कसोटी सामन्यापर्यंत परमार या खेळाडूंसोबतच होते.

खेळाडूंच्या मनात भविष्यामध्ये काय होणार आहे यासंदर्भात भीती आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो, ही सुद्धा चिंता खेळाडूंच्या मनात असल्याचे चर्चेदरम्यान दिसून आले. एखाद्या खेळाडूच्या माध्यमातून भविष्यामध्ये संसर्ग झाल्यास आयपीएलमधील सहभाग आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकामध्ये खेळण्यासंदर्भात अडचणी निर्माण होतील, असे खेळाडूंना वाटत आहे.

या संदर्भात स्काय स्पोर्टसने दिलेल्या वृत्तानुसार नियोजित वेळापत्रकानुसार कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ईसीबीने ही घोषणा केली असून भारतीय चमूमध्ये परमार यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली नसल्याचे ईसीबीने स्पष्ट केले आहे.

या कसोटी सामन्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनेही साशंकता व्यक्त केली होती. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुलींकडे पाचव्या कसोटीसंदर्भात चौकशी करताना कसोटी खेळवली जाणार का यावर त्यांनी, अद्याप ठाऊक नाही, असे उत्तर दिले. सध्या तरी ‘पाचव्या कसोटीबाबत काहीच सांगता येणार नाही. सामना व्हावा, अशी आशा फक्त करता येईल, असे गांगुलीने सांगितले.

त्यांनी कोलकाता येथे ‘मिशन डॉमिनेशन’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली. खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआय सुद्धा हा सामना खेळवण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहे. १९ सप्टेंबरपासून कोरोनाचा फटका बसलेल्या आयपीएलचे उर्वरित पर्व सुरु होत असतानाच या स्पर्धेत पुन्हा अडथळा यावा असे बीसीसीआयला वाटत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाची मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांच्यानंतर परमार यांना लागण झाल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारचे सराव सत्र रद्द करावे लागले. संघामधील सर्व खेळाडूंच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. सावधगिरी म्हणून भारतीय चमूला आपापल्या खोलीत थांबण्याचे निर्देश देण्यात आले होते. शास्त्री यांच्या संपर्कातील भारताचे मुख्य फिजिओ नितीन पटेल सध्या विलगीकरणात असल्यामुळे पाचव्या कसोटीस संघासोबत फिजिओ नसेल.

क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधरसुद्धा विलगीकरणात असून, फक्त फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड संघासोबत आहेत. सर्व खेळाडू आणि मार्गदर्शकांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी इंग्लंडमध्ये जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे दोन्ही संघांमधील खेळाडू सध्या जैव-सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नाहीत. लंडनमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शास्त्री यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या कार्यक्रमाला अरुण, पटेल आणि श्रीधर यांनीही हजेरी लावली होती.

एकीकडे खेळण्याची इच्छा भारताला नसल्याचे सांगितले जात असतानाच दुसरीकडे याच्या अगदी उलट दावेही केला जात आहेत. संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची (ईसीबी) मागणी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने फेटाळून लावल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाची शास्त्री, अरुण आणि परमार यांना लागण झाल्यामुळे भारताचे सर्व खेळाडू सध्या विलगीकरणात आहेत. त्यामुळे भारताने जोखीम पत्करून कसोटी खेळण्याऐवजी इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी मागणी ‘ईसीबी’च्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येते. पण रोहित-विराट यांनी त्यांचा डाव उधळून लावला. तसेच २०२२ मधील मर्यादित षटकांच्या मालिकेवर याचे विपरित परिणाम होतील, असेही भारतीय संघ व्यवस्थापनाने ‘ईसीबी’ला कळवल्याचे समजते. पाचवी कसोटी रद्द झाली, तर भारत २-१ अशा फरकाने मालिका जिंकेल. पण भारताने स्वत:हून पराभव मान्य केल्यास इंग्लंड मालिकेत २-२ अशी बरोबरी साधेल आणि पतौडी करंडक त्यांच्याकडेच कायम राखला जाईल.