‘या’ स्मार्टफोनवर येत्या 27 सप्टेंबरपासून मिळणार नाही Google च्या सेवा


जुन्या ऑपरेटिंग सिस्टमच्या स्मार्टफोनमध्ये Google Maps, Gmail आमि YouTube सपोर्ट देणार नसल्याची घोषणा गुगलने केली आहे. कंपनीने आपल्या निवेदनात असे म्हटले की, 27 सप्टेंबरपासून युकेमध्ये जुन्या अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या युजर्सला गुगल अकाउंट्स लॉग-इन करता येणार नाही. गुगलच्या मते, 27 सप्टेंबरपासून अॅन्ड्रॉइड वर्जन 2.3 चा वापर करणाऱ्या युजर्सला गुगल मॅप, युट्युब आणि जीमेलचा वापर करता येणार नसल्याची माहिती एक्सप्रेस युकेच्या रिपोर्टमधून दिली आहे. दरम्यान, कंपनीने भारतीय युजर्ससाठी हे अॅप काम करणार की नाही याबद्दल स्पष्ट केलेले नाही.

याबाबत कंपनीचे असे म्हणणे आहे की, अॅन्ड्रॉइड 2.3 वर्जन हे जुने झाले आहे. अशातच त्यांचा खासगी डेटा लीक होऊ शकतो. यासाठी जुन्या प्लॅटफॉर्मवर गुगल मॅप्स, युट्यूब आणि जीमेलचा सपोर्ट न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे युजर्सचा डेटा सुरक्षित राहू शकतो. तर 2010 मध्ये अॅन्ड्रॉइड 2.3 Gingerbread हे लॉन्च केले होते.

युजर्सकडे Google चे मोबाईल अॅप्स वापरण्यासाठी, किमान Android 3.0 वर्जन असलेले डिव्हाइस असणे आवश्यक आहे. यासाठी युजर्स फोनच्या सेटिंग्जवर जाऊन सॉफ्टवेअर अपडेट करू शकतात किंवा लेटेस्ट अँड्रॉइड 11 असलेले डिव्हाइस खरेदी करू शकतात.

अलीकडेच अँड्रॉइड 12 ची शेवटचे बीटा वर्जन गुगलने लाँच केले आहे. अँड्रॉइड 12 बीटा 5 मध्ये अनेक वैशिष्ट्ये सुधारली गेली आहेत. यासह, गुगल क्लॉक अॅप देखील अपडेटमध्ये पुन्हा डिझाइन केले गेले आहे. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना नवीन बीटा अपडेटमध्ये डिव्हाइस कंट्रोल शॉर्टकट मिळेल. याद्वारे युजर्सला स्मार्ट उपकरणे सहज वापरू शकतील. अशी अपेक्षा आहे की कंपनी लवकरच या वर्जनचे एक स्थिर अपडेट जारी करेल.