‘लालबागचा राजा’च्या दरबारामध्ये पोलिसांनी पत्रकारांना केलेल्या धक्काबुक्कीवर संतापले फडणवीस !


मुंबई: सध्या सोशल मीडियावर ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संदर्भातील बातम्यांचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की व धमक्या दिल्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. सर्वच स्तरांतून पोलिसांच्या या अरेरावीचा निषेध केला जात आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या अरेरावीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पत्रकार हे त्यांचे काम करत असतात. शिवाय लालबागमध्ये गेलेल्या पत्रकारांकडे अधिकृत पास होते. सर्व नियमांचं पालन करून ते काम करत होते. असे असतानाही त्यांच्यावर दादागिरी करण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली, हे निषेधार्हच आहे.

तो व्हिडिओ मी स्वत: पाहिला. हात काय, पायही तोडू, असे डायलॉग काही पोलीस अधिकारी मारताना त्यात दिसत आहेत. हे वर्तन अत्यंत चुकीचे आहे. खरंतर तिथे गर्दी झाली होती, अशातलाही काही भाग नसल्यामुळे एवढी दंडुकेशाही योग्य नाही. कुणी ह्या दंडुकेशाहीच्या जोरावर कायदा-सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असेल तर बरे नसल्याचे फडणवीस म्हणाले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे, पण त्या आधी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.