दिग्विजय सिंह यांनी केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना


नवी दिल्ली – प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांची विचारसरणीदेखील तालिबानसारखीच असल्याचे वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या आठवड्यात पुन्हा एकदा दुसऱ्यांदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवणाऱ्या तालिबानशी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

एकाच आठवड्यात तालिबानशी आरएसएसची तुलना करण्याची ही दुसरी वेळ आहे. दिग्विजय सिंह यांनी संघप्रमुख डॉ.मोहन भागवत यांच्या जुन्या वक्तव्यावर भाष्य केले, ज्यात त्यांनी म्हटले होते की लग्न ही एक तडजोड आहे. याअंतर्गत महिला घर आणि इतर गोष्टींची काळजी घेतात. तर, पुरुषांवर काम आणि स्त्रीच्या सुरक्षेची जबाबदारी असते.

दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणाऱ्या महिलांबाबत समानता आहे? असे वाटते, मोहन भागवतजी आणि तालिबान त्यांचे विचार जोपर्यंत बदलत नाहीत. हिंदू-मुस्लिम डीएनए एक असल्याच्या आरएसएस प्रमुख भागवत यांच्या विधानावर दिग्विजय सिंह यांना विचारले असता, ते म्हणाले जर तसे असेल तर लव्ह जिहादसारखे मुद्दे का वाढत आहेत? यावेळी जावेद अख्तर यांची पाठराखण देखील दिग्विजय सिंह यांनी केली. ते म्हणाले, भारतीय संविधान प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते.