सचिन वाझेला वैद्यकीय उपचारांसाठी खाजगी रूग्णालयात दाखल होण्याची न्यायालयाची परवानगी


मुंबई : विशेष न्यायालयाने गुरूवारी सचिन वाझेला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईतील खाजगी रूग्णालयात दाखल होण्याची परवानगी दिली आहे. मुकेश अंबानी यांच्या ‘अँटालिया’ या निवासस्थानाबाहेरील स्फोटके आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसाठी हा एक प्रकारे दिलासाच म्हणावा लागेल.

वाझेला विशेष एनआयए न्यायालयाच्या परवानगीनंतर वैद्यकिय उपचारांसाठी भिवंडीतील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण, वाझेने पुढील शस्त्रीक्रियेसाठी मुंबई येथील वोकहार्ट अथवा बॉम्बे रुणालयात दाखल करण्याची परवानगी द्या, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला आहे. गुरूवारी त्या अर्जावर न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांच्यापुढे सुनावणी झाली असता, सरकारी पक्षाकडून त्याला विरोध न झाल्यामुळे न्यायालयाने वाझे यांना मुंबईच्या वोकहार्ट रूग्णालयात सशर्त उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान त्यांच्या पत्नीलाही रूग्णालयात त्यांच्यासोबत उपस्थित राहण्याची मुभा न्यायालायने दिली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर 20 जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. त्यानंतर काही तासांतच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती.

दरम्यान हदयाशी संबंधित त्रास असल्यामुळे न्यायालयाच्या परवानगीनंतर तळोजा कारागृहात असलेल्या वाझेला 30 ऑगस्ट रोजी भिवंडी येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पण, तिथे वैद्याकिय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्यामुळे मुंबईतील बड्या रुणालयात आपल्यावर वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. दरम्यान वाझे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला आहे. पण, वाझे हे बायपास सर्जरी करण्यासाठी आग्रही आहेत.