दोषमुक्त झाल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया


मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत दोषमुक्त केले आहे. याप्रकरणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी केली होती. मुंबई सत्र न्यायालयाने आज याबाबत निर्णय दिला.

छगन भुजबळ यांनी या निर्णयानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. खोटे नाटे आरोप आमच्यावर झाले. मीडिया ट्रायल सुद्धा आमच्यावर झाली. सव्वा दोन वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगातच राहावे लागले. एका पैशाचाही घोटाळा या प्रकरणात झाला नाही, हे आम्ही वारंवार सांगत होतो. आम्ही तेच न्यायालयात सांगितले. त्या केसमधून आज आम्हाला निर्दोष मुक्त केल्याचे भुजबळ म्हणाले.

भुजबळ पुढे म्हणाले की, ईडीची केस या प्रकरणावरुन बांधली गेली आहे. काही लोकांनी तर आम्हाला त्रासच द्यायचे ठरवले होते. त्याचवेळी आम्ही म्हटले होते, की सत्य परेशान होता है, पराजित नहीं. हा निकाल आम्ही विनम्रपणे स्वीकार करत आहोत. आमची कुणाविरोधात तक्रार नाही. नियती कधी कधी दिवस आणते, ते भोगावे लागतात. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे या कटकारस्थानातून आम्ही मुक्त होत असल्याचे ते म्हणाले.

पक्षाने, शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असेही भुजबळ म्हणाले. या प्रकरणात निर्णय देताना न्यायालयाने आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नसल्याचे आज म्हटले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.