नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून 21 दिवसांचा जंगी कार्यक्रम तयार


मुंबई : केंद्रातील मोदी सरकारबद्दल कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तयार झालेल्या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी भाजपने आता जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे निमित्ताचे साधत एक जंगी कार्यक्रमाची आखणी केली आहे. म्हणजेच यानिमित्ताने आगामी सहा महिन्यात पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांचीही तयारी डोळ्यासमोर दिसत आहे.

मोदींची प्रतिमा असलेल्या 14 कोटी रेशन बॅग, थँक यू मोदीजी असा संदेश असलेल्या 5 कोटी पोस्टकार्डचे वाटप आणि देशात 71 ठिकाणी नदी स्वच्छतेचे कार्यक्रम राबवण्यात आले आहे. त्याचबरोबर देशात लसीकरण योग्य गतीने असल्याचा दावा करणारे हाय व्होल्टेज सोशल मीडिया अभियान ही सगळी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपने आखलेल्या अभियानाची जंगी तयारी आहे.

पंतप्रधान मोदींचा 17 सप्टेंबरला 71 वा वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून दरवर्षी हा वाढदिवस भाजप सेवा सप्ताह म्हणून साजरा करत होते. पण यावेळी आणखी एक वेगळे निमित्त आहे. त्यांच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून राजकीय कारकीर्दीला 7 ऑक्टोबरला सलग 20 वर्षे पूर्ण होतील. त्यांनी 7 ऑक्टोबर 2001 मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. याच दोन्ही कारणांमुळे यावेळचा कार्यक्रम हा तीन आठवड्यांचा म्हणजेच 21 दिवसाचा असणार आहे.

मोदी सरकारबद्दलची नकारात्मकता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढली होती. सध्या महागाईचाही आगडोंब उसळला आहे. पेट्रोल डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. घरगुती सिलेंडर नऊशे रुपयांपर्यत पोहचला आहे. अशा वेळी पुढच्या सहा महिन्यांत उत्तर प्रदेशसह पाच महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका होणार असल्यामुळे भाजपने ही वाढदिवसाची संधी साधल्याचे दिसत आहे.