मनसुख हिरेनच्या हत्येची जबाबदारी प्रदीप शर्मांना देण्यात आली होती


मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी व बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर याप्रकरणातील आणखी माहिती समोर येत आहे. मनसुख हिरेनला संपवण्याचा कट रचल्याचा खुलासा आरोपपत्रातून झाला आहे. माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरेनचा खून करण्याचे काम देण्यात आले होते. ३ सप्टेंबर रोजी एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात सचिन वाझेने प्रदीप शर्माला खुनासाठी मोठी रक्कम दिल्याचे म्हटले आहे.

प्रदीप शर्माने मनसुख हिरेनची हत्या करण्याचे काम घेतल्यानंतर संतोष शेलारशी बोलून त्याला खुनात सामील होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी मिळून हिरेनचा खून केला. मनसुख हिरेनचा खून ४ मार्च रोजी झाला आणि २ मार्च रोजी हे सर्व एकत्र भेटले होते. आरोपपत्रात उघड झाले की वाझेने २ मार्च रोजी एक बैठक बोलवली होती. ज्यामध्ये सुनील माने आणि दुसरा पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा दोघेही उपस्थित होते. आधीच मनसुख हिरेन तिथे होता.

वाझेने ही बैठक एनआयएच्या म्हणण्यानुसार, दोघांना हिरेन कसा दिसतो हे जाणून घेण्यासाठी आणि योजनेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बोलावली होती. सचिन वाझे त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा अंधेरीच्या चकला येथे सुनील माने यांना भेटले आणि त्यांना बुकी नरेश गौर यांनी दिलेले सिम कार्ड आणि मोबाईल हँडसेट दिले.

प्रदीप शर्माला मनसुख हिरेनच्या हत्येचे काम देण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या कामासाठी प्रदीप शर्माने संतोष शेलारशी संपर्क साधला आणि पैशाच्या बदल्यात खून करू शकतो का, असे विचारले होते. तेव्हा शेलारने हो म्हटले होते.

संतोष शेलारकडे तवेरा गाडीचा नोंदणी क्रमांक प्रदीप शर्माने मागितला, जी गाडी मनसुख हत्येसाठी वापरली जाणार होती. सचिन वाझेने सुनील माने यांना दिलेल्या सिमकार्डमध्ये काही समस्या होती. त्यामुळे सुनील माने ३ मार्च रोजी सचिन वाझेच्या कार्यालयात गेले आणि दिलेल्या सिमकार्ड मोबाईल फोन परत केला. त्यानंतर वाझे त्याच दिवशी पुन्हा मानेला चकला येथे भेटले. एक नवीन मोबाईल आणि सिम दिले आणि सांगितले की तावडेचे नाव घेऊन मनसुखला फोन करा आणि त्याला ठाण्यात यायला सांगा. तेथे मनसुखला संतोष शेलारकडे सोपवले जाईल.

मानेने ४ मार्च रोजी संध्याकाळी मालाड येथील पोलीस अधिकारी असल्याचे भासवत हिरेनला फोन केला. यानंतर हिरेन त्याला भेटायला तयार झाला. मनसुखला मानेने शेलाकडे सोपवले. शेलार मनीष सोनी, सतीश मोथुकरी आणि आनंद जाधव या तिघांसह तवेरा गाडीच त्यांची वाट पाहत होते. या लोकांनी हिरेनला गाडीमध्येच ठार केले आणि मृतदेह खाडीत फेकून दिला.

आरोपपत्रात पुढे असे म्हटले आहे की वाझे ३ मार्च रोजी पुन्हा एकदा शर्माला भेटले आणि त्यांना पैशांनी भरलेली बॅग दिली, ज्यात ५०० रुपयांच्या नोटा होत्या. प्रदीप शर्माने पैसे घेतल्यानंतर शेलारला फोन करून लाल तवेराची व्यवस्था करण्यास सांगितले. हिरेनला मारण्यासाठी आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शर्माला या वाहनाचा वापर करायचा होता.