५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीसांकडे नवी जबाबदारी!


नवी दिल्ली – राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात वेगळी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. देवेंद्र फडणवीस यांचा समावेश भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. या चर्चेला देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्यांमुळे अधिकच खतपाणी घातले जात असल्यामुळे आता देशाच्या राजकारणात फडणवीस सक्रिय होतील, असे देखील बोलले गेले. पण, या सर्व चर्चाच ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांकडे भाजपने नवी जबाबदारी सोपवली आहे. पुढील वर्षी देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवणार आहे.

देशात येत्या वर्षभरात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. भाजपने या निवडणुकांच्या तयारीसाठी आतापासूनच कंबर कसली आहे. या निवडणुका मार्च-एप्रिल-मे या तीन ते चार महिन्यांमध्ये होतील. त्यासाठी भाजपने पदाधिकारी आणि जबाबदारी वाटपामध्ये फेरबदल केले आहेत.

भाजपने या राज्यांच्या निवडणुकांसाठी नव्या प्रभारींची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्यामुळे आगामी २०२२ सालात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची निवडणूक रणनीती आणि इतर सर्व निर्णय प्रक्रिया फडणवीसांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. याआधी बिहार निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीस यांना पक्षाने जबाबदारी दिली होती. त्या बिहार निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले होते.

त्यांच्यापाठोपाठ इतर चार राज्यांमधील प्रभारी देखील भाजपने बदलले आहेत. यामध्ये उत्तराखंडची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवली आहे. पंजाबची जबाबदारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे दिली आहे. मणिपूरसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर उत्तर प्रदेश या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.