‘विराट’सेनेची चिंता वाढवण्यासाठी ‘तो’ इंग्लंडच्या संघात परत आला आहे


नवी दिल्ली – इंग्लंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली असून दोन बदल इंग्लंडच्या संघामध्ये करण्यात आले आहे. संघामध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लेच आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारताने मालिकेमध्ये २-१ ची आघाडी मिळवली असून मालिका अनिर्णित ठेवण्यासाठी इंग्लंडला भारताला पराभूत करावे लागणार आहे.

भारताने ओव्हलच्या मैदानावर इंग्लंडला १५७ धावांनी मात दिल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने धडाकेबाज फलंदाज असणाऱ्या बटलरला संघात स्थान दिले आहे. आज म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी बटलरचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पुन्हा संघात स्थान दिले आहे. पाचव्या कसोटीमधून सॅम बिलिंग्जला वगळण्यात आले आहे.

बटलरबरोबरच लेचचाही समावेश करण्यात आला असून मोईन अलीसोबत तो फिरकी गोलंदाज म्हणून पर्यायी खेळाडू म्हणून उपलब्ध असेल. श्रीलंका आणि भारताविरोधातील सामन्यांमध्ये सहा सामन्यांमध्ये एकूण २८ बळी घेणारा लेच मार्चनंतर कसोटी खेळलेला नाही. दुसरीकडे बटलरसारखा स्फोटक फलंदाज संघात असल्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजीला मधल्या फळीत बळकटी मिळणार आहे.

२०१५ साली बटलरने पाकिस्तानविरोधातील एकदिवसीय सामन्यात ४६ चेंडूंमध्ये ठोकलेले शतक आजही अनेकांच्या लक्षात आहे. आपल्या स्फोटक खेळीसोबतच बटलर संयमी खेळीसुद्धा करतो, त्यामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. १० तारखेपासून मँचेस्टरमध्ये पाचवा कसोटी सामना सुरु होणार आहे.

कौटुंबिक कारणामुळे चौथी कसोटी बटलरला खेळता आली नाही. बटलरला पुत्रप्राप्ती झाल्यामुळे तो सुट्टीवर होता. आता तो पुन्हा उपकर्णधार म्हणून संघात आल्यास जॉन ब्रिस्टोव्ह किंवा ओली पोपेचे संघातील स्थान धोक्यात येणार आहे. आता जो रुटला जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्स या दोघांपैकी एकाला संघात स्थान द्यावे लागण्याची शक्यता आहे. अँडरसन आणि रॉबिन्स दोघांनाही भन्नाट कमागिरी केली आहे.

मला या दोघांच्याही खेळामध्ये योगदानासाठी त्यांचा अभिमाव वाटतो. त्यांनी संघासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे. पण आम्हाला काही ठोस निर्णय घ्यावे लागणार असल्याचे म्हणत रुटने दोघांपैकी एकालाच प्लेइंग इलेव्हमध्ये संधी दिली जाईल, असे संकेत दिले आहेत. रुटच्या संघाला भारताला पराभूत करावे लागणार आहे. नाहीतर १९८६ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर दोन मालिका गमावणारा संघ ठरेल. यापूर्वी न्यूझीलंडने त्यांना पराभूत केले होते.

पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ : जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रॉरी बर्नस, जोस बटलर, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लेच, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हर्टन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वूड