रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; दाखल झाली NDRF टीम


चिपळूण – हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आज चिपळूणमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले. हे पथक २५ जवानांसह आवश्यक ती यंत्रणा घेऊन पुणेमार्गे चिपळूणमध्ये दाखल झाले आहे. पुन्हा चिपळूणमध्ये महापूर आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी या पथकाची मोठी मदत होणार आहे.

चिपळूणमध्ये २२ जुलैला महापूर आला होता, त्यावेळी हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. एनडीआरएफला त्यांना वाचवण्यासाठी पाचारण करण्यात आले. पण पुणेमार्गे येताना सातारा कोयना येथे या टीमला अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल १४ तास उशिरा हे पथक चिपळूणमध्ये दाखल झाले. तत्पूर्वी स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरू झाले होते, त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला फारसे काम राहिले नव्हते. एनडीआरएफची टीम उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनावर टीकाही झाली होती.

९ सप्टेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. गेली १७ तास चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहराच्या सखल भागात पाणी भरत असून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाण्याचा निचरा होत आहे. परंतु प्रशासनाने 22 जुलैच्या महापुराचा धडा घेत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन केले आहे. शहरात विभागवार नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी भरण्यास सुरवात झाल्यानंतर भोंगा वाजवून सतर्कतेचा इशाराही दिला जात आहे.