राज्यातील एकूण कोरोनाबाधितांपैकी २२ टक्के रुग्ण पुण्यातील


पुणे – राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसत असले तरी संकट अद्याप टळलेले नाही. गेल्या १० दिवसांत राज्यातील वाढलेल्या कोरोनाबाधितांपैकी सुमारे २२ टक्के रुग्ण हे केवळ पुण्यातील असल्याची माहिती आता समोर आली आहे.

राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, पुणे जिल्ह्यात २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान एकूण ९,८१५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगरमध्ये ७,५५५ त्यानंतर साताऱ्यामध्ये ५,०३३, सोलापूरमध्ये ४,०६७ आणि मुंबईमध्ये ३,८४३ रुग्ण गेल्या दहा दिवसांत राज्यात आढळले आहेत. महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी अहवालाचे निष्कर्ष व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये सादर केले. राज्यभरात, याच कालावधीत ४४,४३७ नवे कोरोनाबाधित आढळले.

पुणे जिल्ह्यात साप्ताहिक कोरोनाबाधित आढळण्याच्या दरातही सतत वाढ दिसून येत आहे. राज्याचा बाधित रुग्ण आढळण्याचा दर २.७१ टक्के आहे. अहमदनगर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि नाशिक हे इतर जिल्हे आहेत ज्यांचा रुग्ण बाधित आढळण्याचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

अहवालात पुढे असे सांगण्यात आले की धुळ्यात ४ सप्टेंबर रोजी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी नंदुरबारमध्ये फक्त एकच रुग्णाची नोंद झाली आहे. वर्धा, वाशिम, नागपूर, गडचिरोली, परभणी, हिंगोली, जळगाव, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ ह्या १७ जिल्ह्यांत १०० पेक्षा कमी कोरोनाबाधित आहेत.