गणेशोत्सवादरम्यानच्या नाईट कर्फ्यू बाबत विजय वडेट्टीवारांनी दिली महत्वाची माहिती


मुंबई – राज्यावर ओढावलेले दुष्ट कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून निर्बंध शिथील केले असले तरीही नियमांचे उल्लंघन करु नका, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून केले जात आहे. दरम्यान कोरोनाचे संकट गणेशोत्सवावरही असून नुकतीच आपत्ती व्यवस्थापनासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. गणेशोत्सवासंबंधी नियमावली पुढील एक ते दोन दिवसांत जाहीर केली जाणार असल्याची माहिती बैठकीत सहभागी झालेले राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

नियमांचे पालन जर लोकांनी केले नाही, तर रुग्णसंख्या आणि कोरोना संकट पुन्हा एकदा वाढू शकते. अशा पार्श्वभूमीवर काही उचित निर्णय घ्यावे लागतील, अशी चर्चा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तज्ज्ञांशी आज उद्या चर्चा करुन एक दोन दिवसात मुख्यमंत्री नियमावली जाहीर करतील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. दरम्यान यावेळी नाईट कर्फ्यूबाबत विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, नाईट कर्फ्यूबाबत कोणतीही चर्चा किंवा निर्णय झालेला नाही. तसेच राज्य सरकारचा नाईट कर्फ्यू लावण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.