कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना पथकरातून सवलत – एकनाथ शिंदे


मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा केली. या पथकर सवलतीसाठी चाकरमान्यांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.

कोकणात आगामी गणेशोत्सव कालावधीत जाणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अपर पोलीस महासंचालक (महामार्ग वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहे. कोकणवासियांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज, शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले.

कोकणात दरवर्षीप्रमाणे यंदाही जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याची घोषणा करतानाच या वाहनांसाठी स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही यावेळी शिंदे यांनी दिले. मुंबई-पुणे, पुणे-सातारा, मुंबई-गोवा या महामार्गावरील पथकर नाक्यांवर अधिकचे मनुष्यबळ नेमणूक करुन गणेश भक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने पथकर नाक्यांवर भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

गणेश भक्तांशी पथकर नाक्यांवर वाद घालू नका, पथकर सवलतीचे स्टीकर्स उपलब्ध करुन देण्याबरोबर पथकर नाक्यांवर रुग्णवाहिका, जलद प्रतिसाद वाहने, जेसीबीबरोबरच पुरेसे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोरोनाचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.