रवी शास्त्रींपाठोपाठ टीम इंडियातील आणखी दोन सदस्यांना कोरोनाची लागण


लंडन : टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान मोठा धक्का लागला. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यानंतर आता गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि आर. श्रीधर यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. या तिघांच्या आरटी-पीसीआर टेस्टचे रिपोर्ट सोमवारी मिळाले आहेत. रवी शास्त्रींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोघांना संपर्कात आल्यामुळे आधीच आयसोलेट करण्यात आले होते. आता शास्त्री यांच्यासह भरत अरुण आणि आर. श्रीधर यांनाही 10 दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. 4 सप्टेंबरला करण्यात आलेल्या लॅटरल फ्लो टेस्टमध्ये रवी शास्त्री पॉझिटिव्ह आले होते.

त्यांना यानंतर आयसोलेट करण्यात आले होते. रवी शास्त्रींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचीही टेस्ट करण्यात आली. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूंना खेळण्याची परवानगी देण्यात आली. रवी शास्त्री यांच्या घशाला त्रास होत आहे. 59 वर्षांच्या शास्त्रींनी टीम हॉटेलमध्ये आपल्या पुस्तक विमोचनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता, यावेळी ते कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्याचे वृत्त आहे. याशिवाय भरत अरुण, नितीन पटे आणि श्रीधर हेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. रवी शास्त्री आता टीम इंडियासोबत पाचव्या टेस्टसाठी मॅनचेस्टरलाही जाणार नाहीत. त्याचबरोबर त्यांना भारतात परतण्याआधी आयसोलेशन कालावधी पूर्ण करावा लागेल, तसेच रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच ते भारतात परतू शकतात.