विधानसभेतील नमाजच्या खोल्यांवरून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि भाजप आमनेसामने


रांची : नमाज अदा करण्यासाठी झारखंड सरकारने विधानसभेत काही खोल्या आरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याच्या 24 तासांच्या आतच राज्यात या मुद्यावरून राजकिय वातावरण तापले आहे. आज सकाळी जेव्हा विधानसभेचे कामकाज सुरू झाले, तेव्हा भाजपने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करत जोरदार टीका केल्यामुळे विधानसभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही जोरदार टीका केली आहे. मनात आस्था असेल तर ठिक नाही तर सगळीकडे शत्रुच दिसतात, असा घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे.

ते विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासाला उत्तर देत होते. त्यामुळे आता आक्रमक झालेले विरोधक बघून मुख्यमंत्री सोरेन हे ही काहीसे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. कोणत्याही गोष्टीचे समाधान होत नसेल, तर त्यासाठी मनात आस्था असावी लागते नाही तर सगळीकडे शत्रुच दिसतात, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. हा निर्णय जर तातडीने रद्द झाला नाही, तर विधानसभेसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. झारखंडमध्ये आता हा नवीनच वाद सुरू झाल्यामुळे सत्ताधारी विरुद्ध भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली आहे. हा मुद्दा आता आणखी किती काळ गाजणार यावरुन विधानसभेच्या सेशनची यशस्विता अवलंबून आहे.