जाणून घेऊ या पर्ल हार्बरबद्दल काही रोचक तथ्ये


ओआहू नामक हवाईयन बेटावर अमेरिकेच्या अधिपत्याखाली असलेले पर्ल हार्बर दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळामध्ये जपानी क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे उध्वस्त झाले. या घटनेशी निगडित इतिहास आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. या घटनेचा समावेश केवळ शालेय अभ्यासक्रमातही केला गेला असून, यावर आधारित अनेक माहितीपट, चित्रपट आजवर बनविण्यात आले आहेत, तसेच यावर अनेक पुस्तकेही लिहिली गेली आहेत. मात्र हे ठिकाण केवळ या एकाच घटनेशी निगडित नसून, या ठिकाणाशी निगडित अनेक रोचक तथ्ये आहेत, जी फारशी सर्वश्रुत नाहीत. पर्ल हार्बरचे हवाईयन नाव ‘वाई मोमी’ आहे. या ठिकाणी कायम मोती असलेले शिंपले सापडत असल्याने त्या ठिकाणाला हे नाव देण्यात आले आहे. ‘मोत्यांनी भरलेले पाणी’ असा या नावाचा शब्दशः अर्थ आहे. मात्र प्रदूषण आणि अतिरिक्त मात्रेमध्ये शिंपल्यांचा होणारा उपसा यामुळे एकोणिसाव्या शतकापासून येथील शिंपले दुर्मिळ होऊ लागले.

पर्ल हार्बर या ठिकाणी एके काळी शार्क देवतेचे अस्तित्व असल्याचे ही म्हटले जाते. याच्याशी निगडित आख्यायिकेच्या अनुसार या ठिकाणी राहणारी ‘काहुपाहाऊ’ नामक स्त्री, तिच्या भावासोबत राहत असे. त्यानंतर तिचे रूपांतर शार्क माश्यामध्ये झाले. पर्ल हार्बरच्या जवळच असलेल्या गुफांमध्ये या शार्क देवतेचे वास्तव्य असे. येथे मासेमारीसाठी येणाऱ्या सर्व मच्छीमारांचे ही शार्क देवता रक्षण करीत असल्याचे म्हटले जाते. मात्र विश्वयुद्धाच्या वेळी या शार्क देवतेचा नाश झाल्याचे म्हटले जाते.

डिसेंबर सात १९४१ साली पर्ल हार्बरवर झालेला हल्ला दोन टप्प्यांमध्ये केला गेला होता. या हल्ल्याच्या पूर्वी जपानने आपल्या नौसेनेची सहा एअरक्राफ्ट कॅरियर्स तैनात केली असून, या सर्व एअरक्राफ्ट कॅरियर्सवर मिळून एकूण ४१४ विमाने होती. या एअर क्राफ्ट कॅरियर्स आधीपासूनच चर्चा करून पूर्वनियोजित स्थळांवर, ओआहूपासून २३० मैलांवर उभ्या केल्या गेल्या होत्या. या एअरक्राफ्ट कॅरियर्समध्ये रेडियो कम्युनिकेशन अजिबात नव्हते, त्यामुळे अमेरिकेला या एअरक्राफ्ट कॅरियर येथे उभ्या असल्याचा पत्ता लागू शकला नाही. ७ डिसेंबर १९४१ साली सकाळी सहा वाजता या सहाही एअरक्राफ्ट कॅरियर्स वरून हल्ल्याच्या पहिल्या टप्या् साठी विमानांनी उड्डाण केले, आणि आठ वाजण्याच्या काहीच मिनिटे आधी, पर्ल हार्बरवर पहिला हवाई हल्ला झाला. अमेरिकन सैन्याला या हल्ल्याची कोणतीही कल्पना नसल्याने या हल्ल्यांनी अमेरिकन सैन्याची दाणादाण उडाली.

हल्ल्याचा दुसरा टप्पा नऊ वाजण्याच्या सुमाराला सुरु झाला. ही सर्व विमाने पर्ल हार्बरवर यशस्वी हल्ला करून दहा वाजण्याच्या सुमारास आपापल्या एअरक्राफ्ट सुखरूप परतली. या दोन्ही हल्ल्यांमध्ये अमेरिकन सैन्याची एकूण १८८ विमाने संपूर्णपणे नष्ट झाली, तर आणखी १५९ विमानांची प्रचंड मोडतोड झाली. या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या २१ युद्धनौकांचीही मोठी हानी झाली. एकूण २४०३ अमेरिकन नागरिकांना प्राणांना मुकावे लागले, तर ११७८ लोक या हल्ल्यांमध्ये जखमी झाले होते.

Leave a Comment