शहजादा सलीमची प्रेयसी अनारकली – सत्य की कल्पना?


१९६०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या दिलीपकुमार आणि मधुबाला अभिनीत ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाने मुघल सम्राट अकबराचा पुत्र सलीम (जहांगीर) आणि दरबारची नर्तकी असलेल्या अनारकलीची प्रेमकहाणी घराघरात पोहोचविली. पण ही प्रेमकहाणी खरोखरीच घडली, की ही निव्वळ एक कल्पना आहे, यावर गेली अनेक वर्षे चर्चा होत आल्या आहेत. अनारकली नामक नर्तकी खरोखरच अस्तित्वात होती का, तिचे आणि सलीमचे असलेले प्रेमसंबध मुळीच मंजूर नसल्याने तिला सम्राटाच्या आज्ञेवरून खरोखरीच भिंतीमध्ये चिणून मारले का, या प्रश्नांचे उत्तर कदाचित तुम्हाला थक्क करून सोडेल. यामागचे वास्तव शोधण्याच्या प्रवासाची सुरुवात आपल्याला सध्या पाकिस्तानात असलेल्या लाहोरपासून करायला हवी. या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एक अतिशय साधेसेच, मुघलकालीन समाधीस्थळ आहे.

हे समाधीस्थळ ‘अनारकलीचा मकबरा’ या नावाने ओळखले जात असून, याच्या आसपास वसलेल्या बाजारपेठेला देखील अनारकलीचेच नाव देण्यात येऊन याला ‘अनारकली बाजार’ म्हटले जाते. या मकबऱ्यामध्ये ज्या व्यक्तीचे अवशेष दफन आहेत, त्या व्यक्तीचा मृत्यू १५९९ सालच्या सुमारास झाला असून, १६१९ सालच्या सुमारास हे समाधीस्थळ निर्माण करण्यात आले होते. या मकबऱ्याच्या अंतर्भागामध्ये अतिशय सुंदर कोरीवकाम असलेली एक संगमरवरी कबर असून, त्यावर पर्शियन भाषेमध्ये काही ओळी कोरलेल्या आहेत. ‘माझ्या प्रेयसीचा चेहरा मला एकदा जरी पाहता आला, तरी मी ईश्वराचे खूप आभार मानेन’ अश्या अर्थी या ओळी असून, त्याखाली या ओळी ज्याने रचल्या आहेत त्याचे नाव आहे. हे नाव ‘मजनू सलीम अकबर’ म्हणजेच अनारकलीच्या प्रेमात स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडलेल्या अकबर-पुत्र सलीमचे आहे !

सलीम आणि अनारकलीच्या प्रेमकहाणीचा हा एकच पुरावा अस्तित्वात असल्याचे म्हटले जात असले, तरी वास्तवात या कबरीमध्ये असलेले अवशेष नेमके कोणाचे आहेत, याचा शोध मात्र आजतागायत लागलेला नाही. याबाबतीत अनेक आख्यायिका ऐकायला मिळत असून स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नादिरा बेगम उर्फ शरी-उन-निसा नामक अतिशय देखणी नर्तकी मुघल दरबारी असून, तिला अनारकली म्हणून संबोधले जात असे. अनारकली आणि मुघल साम्राज्याचे युवराज जहांगीर (सलीम) यांचे प्रेमसंबंध सुरु होऊन त्याचे परिमार्जन अनारकलीला लाहोरच्या किल्ल्याच्या भिंतीमध्ये चिणून मारण्यात झाले ही कथा आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. त्यानंतर जेव्हा जहांगीर मुघल सम्राट बनले तेव्हा त्यांनी आपल्या प्रेयसीसाठी हे समाधीस्थळ बनविले असल्याची ही आख्यायिका आहे.

मात्र या आख्यायिकेशी अनेक इतिहासकार सहमत नाहीत. १५९९ सालच्या सुमारास अकबर आणि जहांगीर यांचे परस्परांशी असलेले मतभेद विकोपाला गेले असून, जहांगीरने १६०० साली आपल्याच पित्याच्या, म्हणजे अकबराच्या विरोधात बंडही पुकारले होते. मात्र या वादांच्या, मतभेदांच्या मुळाशी अनारकली, किंवा तिच्याशी जहांगीरचे असलेले प्रेमसंबध होते, याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. किंबहुना १६०५ ते १६२२ या काळा दरम्यान जहांगीरच्या आयुष्याचे वर्णन करणाऱ्या, ‘तुझुक-ए-जहांगिरी’ या आत्मचरित्रातही अनारकलीचा उल्लेख कुठेच आढळत नाही. या आत्मचरित्रामध्ये जहांगीरने आपल्या भावनांचे, आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या अनेक घटनांचे विस्तृत विवरण दिलेले आढळते. अतिशय दुर्मिळ असणारऱ्या, खास दक्षिण अमेरिकेहून मागविलेल्या ‘टर्की’ पक्ष्यापासून दख्खनचा सेनाधिपती मलिक अंबरबद्दलची मते, इथवर सर्व बाबींचा सविस्तर उल्लेख करत असताना, जिच्या स्मृतीप्रीत्यर्थ समाधीस्थळ बनवविले अश्या अनारकलीशी असलेल्या प्रेमसंबंधांचा उल्लेख जहांगीराने आपल्या आत्मचरित्रात का केला नसावा, हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे. केवळ जहांगीरच्या आत्मचरित्रात नाही, तर तत्कालीन ऐतिहासिक साहित्यामध्येही अनारकलीचा उल्लेख आढळत नाही. किंबहुना अबुल फझलने लिहिलेल्या ‘अकबरनामा’मध्येही तिचा उल्लेख नाही.

या समाधीस्थळामध्ये असणारे अवशेष कोणाचे असावेत याबाबत अठराव्या शतकातील लाहोरमधील काही इतिहासकारांनी (अब्दुला चागती व मुहम्मद बाकीर) त्यांच्या शंका वर्तविल्या आहेत. त्यांच्या मतानुसार हे समाधीस्थळ ज्या ठिकाणी उभे आहे, त्या ठिकाणी डाळींबाच्या बागा असून, त्या ठिकाणाला त्या काळी ‘बाग अनारकली’ म्हणून संबोधले जात असे. या बागेमध्ये एक कबर पहिल्यापासूनच अस्तित्वात होती. मात्र गेल्या काही दशकांमध्ये, ही कबर जहांगीरची प्रेमिका असलेल्या अनारकलीची आहे ही स्थानिक लोकांनी निर्माण केलेली कथा असण्याची शक्यता या इतिहासकारांनी वर्तविली आहे. याच कथेवर आधारित अनेक नाटके, आणि नंतर चित्रपटही लोकप्रिय झाल्याने ही कथा आता लोकांच्या मनामध्ये वास्तवाचे रूप धरण करून असल्याचे इतिहासकार म्हणतात.

Leave a Comment