आजकाल जगभरामध्ये कुठेही पोहोचण्यासाठी विमानप्रवास हा सर्वात वेगवान आणि सर्वाधिक पसंत केला जाणारा पर्याय ठरू लागला आहे. तसेच विमानप्रवास करण्यासाठी अनेक विमानकंपन्यांचे पर्याय उपलब्ध झाल्याने जगभरामध्ये कुठल्याही देशामध्ये प्रवास करण्यासाठी भरमसाट रक्कम खर्च न करता आपल्याला परवडेल अश्या विमानकंपनीच्या द्वारे प्रवास करणे शक्य झाल्याने एके काळी केवळ श्रीमंत व्यक्तींना परवडणारा विमानप्रवास आता मध्यमवर्गीयांच्या खिश्यालाही परवडण्याजोगा झाला आहे.
त्यातून अनेक विमान कंपन्या आपला नफा वाढविण्यासाठी निरनिरळ्या देशांमध्ये थेट विमानसेवाही पुरवू लागल्याने प्रवाश्यांचा, प्रवासाच्या दरम्यान अनेक ठिकाणी फ्लाईट बदलत जाण्याचा त्रासही आपोपाप कमी झाला आहे. आता ठिकठीकाणी पोहोचण्यासाठी विनाथांबा थेट विमानसेवा पुरविली जात असली, तरी या प्रवासासाठी लागणारा वेळ मात्र जास्त झाला आहे. त्यामुळे काही विमानप्रवास हे सर्वाधिक वेळ घेणारे ठरत आहेत.
आजकाल परदेशात जाण्यासाठी निघाले की साधारण सात ते दहा तास अवधी प्रवासासाठी लागत असतो. मात्र काही विमानप्रवास याहूनही कितीतरी अधिक वेळाचे आहेत. २००८ साली एमिरेट्स एअरलाईन्सने सॅन फ्रान्सिस्को ते दुबई अशी विमानसेवा सुरु केली. एकूण १३,०४१ किलोमीटरचे अंतर कापणारे, सुरुवातीला उपलब्ध असलेले बोईंग ७७७-२ एलआर विमान हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सोळा तासांचा अवधी घेत असे. आता बोईंगच्या ऐवजी आणखी मोठे असे एअरबस ए ३८० हे विमान या प्रवासासाठी वापरले जात असते.
अमेरिकेहून हॉंगकॉंग येथे थेट विमानसेवा आता डॅलस/फोर्ट येथून उपलब्ध असून, बोईंग ७७७ने केल्या जाणाऱ्या १३,०७२ किलोमीटरच्या या प्रवासासाठी सोळा तास वीस मिनिटांचा अवधी लागतो, तर वॉशिंग्टन ते हॉंगकॉंग या प्रवासासाठी पंधरा तास पंचावन्न मिनिटांचा अवधी लागतो. ही विमानसेवा कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सच्या वतीने पुरविण्यात येत असते.
एमिरेट्स एअरलाईन्सच्या दुबई ते ह्युस्टन या प्रवासासाठी सोळा तास वीस मिनिटांचा अवधी लागत असून, एअरबस ए-३८० या ५१८ सीट्स असलेल्या अजस्त्र विमानाद्वारे हा प्रवास केला जात असतो. कॅनडातील व्हॅन्कूव्हर पासून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नपर्यंतची थेट विमानसेवा २०१७ साली सुरु करण्यात आली असून याही विमानप्रवासासाठी सोळा तास वीस मिनिटांचा अवधी लागतो, तर कॅनडातील टोरोंटो ते फिलिपिन्समधील मनिला पर्यंतच्या थेट प्रवासासाठी साडे पंधरा तासांचा कालावधी लागतो.
ही विमानसेवा फिलिपिन्स एअरलाईन्सच्या वतीने पुरविण्यात येत असते. अमेरिकेतील अटलांटापासून साऊथ आफ्रिकेतील जोहानेसबर्ग इथवरचा १३,५८१ किलोमीटरचा प्रवास तब्बल सोळा तास पन्नास मिनिटांचा आहे. डेल्टा एअरलाईन्सच्या वतीने ही थेट विमानसेवा पुरविली जात असून २००९ सालापासून ही विमानसेवा सुरु केली गेली आहे, तर ऑस्ट्रेलियातील सिडनी पासून अमेरिकेतील ह्युस्टन पर्यंतचा थेट प्रवासही २०१७ सालापासून युनायटेड एअरलाईन्सच्या वतीने सुरु करण्यात आला असून, या १३,८३४ किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल साडे सतरा तासांचा अवधी लागतो.