जाणून घेऊ या भगवान शिवशंकरांशी निगडित काही रोचक तथ्ये


श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असून या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या आराधनेला विशेष महत्व दिले जाते. याच निमित्ताने शिवशंकरांशी निगडित काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या. भगवान शिव अनादि मानले गेले आहेत. ‘अनादि’ म्हणजे सदैव अस्तित्वात असलेले हे दैवत असल्याने यांचा जन्म कसा झाला, यांचे मातापिता कोण हे कोणीच सांगू शकत नाही. भगवान शिवाच्या नर्तन करत असतानाच्या रूपाला ‘नटराज’ म्हटले गेले असून, हे नृत्यकलेचे दैवत आहे. कोणत्याही देवतेची मूर्ती भंगलेली असली, तुटली असली, तर या मूर्तीची पूजा केली जात नाही, मात्र शिवलिंग कितीही खंडित असले, तरी त्याची पूजा केली जाण्याची परंपरा आहे.

शिवशंकरांना एक भगिनी असून, तिचे नाव अमावरी असे होते. पार्वतीच्या आग्रहाखातर शिवशंकरांनी स्वतःच्या मायाशक्तीने अमावरीला अस्तित्वात आणले होते. भगवान शिव आणि पार्वती यांना एक पुत्र होता, तो म्हणजे कार्तिकेय. त्यांच्या दुसरा पुत्र असलेल्या गणपतीची निर्मिती पार्वतीने आपल्या अंगावरील लेपाने केली असल्याची आख्यायिका रूढ आहे. शिवपूजा करताना बेलपत्र वाहण्याची पद्धत आहे. मात्र बेलपत्र वाहताना त्यासोबत जल देखील अर्पण करायचे असा नियम आहे. शिवलिंगावर जल शंखाद्वारे चढविणे जाणे वर्ज्य मानले गेले आहे, कारण शंखचुडाला शंकरांनी आपल्या त्रिशुळाने भस्म केले होते, आणि त्याच्याच हाडांपासून शंखाची निर्मिती झाली असल्याची आख्यायिका आहे.

भगवान शंकरांच्या गळयाभोवती जो नाग आहे तो वासुकी असून, शेषनागानंतर समस्त नागकुल वासुकीच्या अधिपत्याखाली होते. भगवान शिवाची वासुकीवर विशेष मर्जी असल्याने त्यांनी या नागाला गळ्यामध्ये धारण केले होते. शंकराचे वाहन नंदी त्याच्या गणामध्ये सर्वोच्च असून, शिलाद ऋषींना वरदान म्हणून प्राप्त झालेला पुत्र होता. या पुत्राने कठोर तप केल्याने त्याला शिवाचे वाहन होण्याचे भाग्य लाभले.

Leave a Comment