या ओसाड पडलेल्या गावामध्ये सर्वच घरे ‘युएफओ’च्या आकाराची


तैवान मधील वॉनली हे गाव रहस्याच्या पडद्यामध्ये गुरफटलेले म्हणायला हवे. आजच्या काळामध्ये हे गाव ओसाड असले, तरी या गावातील घरे आजही अस्तित्वात आहेत. या घरांची खासियत अशी, यातील बहुतांश घरे चक्क ‘युएफओ’ च्या आकारामध्ये बनलेली आहेत. १९७०च्या दशकामध्ये या गावातील लोक गाव सोडून निघून गेले. या लोकांनी गाव सोडून जाण्यामागे नेमके काय कारण असावे हे नेमके सांगता येत नाही. पण गावातील लोक नाहीसे झाले असले, तरी त्यांनी मागे ठेवलेली त्यांची घरे आजही उभी आहेत.

या गावामध्ये दोन प्रकारची घरे अस्तित्वात आहेत. आकाराने चौकोनी, एखाद्या पेटीप्रमाणे दिसणारी घरे ‘व्हेन्ट्युरो’ नावाने ओळखली जात असत, तर युएफओच्या आकारांची घरे ‘फ्युचुरो’ या नावाने ओळखली जात असत. फिनिश स्थापत्यविशारद मॅटी सुरोनेन यांनी ही घरे डिझाईन केली होती. या घरांच्या रचनेची कल्पना सुरोनेन यांची असली, तरी निर्मिती मात्र इतर कोणाची आहे. सुरोनेन यांच्या डिझाइन्सवर आधारित ही घरे नेमकी कोणी आणि कधी बनविली याची मात्र कोणतीच माहिती उपलब्ध नाही!

ही घरे बनल्यानंतर येथील रहिवासी या घरांमध्ये किती काळ राहिले, आणि त्यानंतर अचानक आपापली घरे आणि गाव सोडून का निघून गेले यावरही कोणतीच माहिती उपलब्ध नाही. कदाचित या गावाच्या आसपास वस्ती वाढली असल्याने या गावातील लोक हा गाव सोडून निघून गेले असल्याचेही म्हटले जाते.

काहींच्या म्हणण्यानुसार हे ‘युएफओ व्हिलेज’ झपाटलेले असून या गावामध्ये अनेक विचित्र घटना घडल्या असल्याचे म्हटले जाते. या गावामध्ये राहणाऱ्या अनेक व्यक्ती रहस्यमय रित्या गायब झाल्याचे म्हटले जात असून, अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असल्याचेही म्हटले जाते. या व्यक्तींच्या मृत्युसाठीची कारणे मात्र आजतागायत स्पष्ट होऊ शकलेली नाहीत.

Leave a Comment