संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता


पुणे – महाविकास आघाडीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचेच सरकार असते, हे लक्षात घ्या, कारण सध्या राज्यात ठाकरे सरकार आहे. पण सगळे आपलेच असल्याचे संजय राऊत पुण्यातील जून्नर तालूक्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात म्हणाले आहेत.

संजय राऊत पुढे म्हणाले, सगळ्यांना शिवसेनेची गरज लागते. राष्ट्रवादीला लागते, काँग्रेसला लागते आणि भाजपलाही लागतेच. यालाच पॉवर म्हणतात. महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचे सरकार असले, तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो सरकार त्यांचेच असते, हे लक्षात ठेवा. संजय राऊत यांनी पुढे बोलतांना आपले वक्तव्य सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, हे ठाकरे सरकार आहे ना, हे काले झाले, आता झाले आहे, दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नावाचे सरकार नाही. ठिक आहे पण सगळे आपलेच आहेत.

तत्पुर्वी राऊतांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना स्वबळावर लढण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त करणाऱ्या पक्षांबद्दल भाष्य केले होते. स्वबळावर लढण्याची भाजप, काँग्रेसची तयारी असेल तर शिवसेना-राष्ट्रवादीची युती का होऊ शकत नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र लढावे लागेल. आम्ही स्वबळावर लढू, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीपैकी कोणीही म्हटलेले नाही. भविष्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रातील दोन पक्ष एकत्र आले आणि निवडणूक लढले, तर राज्यात चमत्कार होईल, असे राऊत म्हणाले.