पॅरालिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगतला सुवर्ण, तर मनोज सरकारला कांस्यपदक


टोकियो – भारतासाठी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये शनिवार हा अतिशय खास दिवस ठरला. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने पुरुषांच्या SL3 प्रकारात अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. तर याच प्रकारात जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत करत मनोज सरकारने कांस्यपदक पटकावले. पुरुष एकेरीच्या SL4 प्रकारात, सुहास यथिराजने सुवर्णपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे.

प्रमोदपूर्वी P4 मिश्रित ५० मीटर पिस्तूल SH1 नेमबाजीमध्ये भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले. १९ वर्षीय नरवालने २१८.२ गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला आहे. दुसरीकडे, मंगळवारी कांस्य जिंकणाऱ्या सिंहराजने आज २१६.७ गुणांसह रौप्यपदक जिंकले. रशियन ऑलिम्पिक समितीचे सेर्गेई मालिशेव यांनी १९६.८ गुणांसह कांस्यपदक जिंकले. यापूर्वी पात्रता फेरीत सिंहराज अधाना ५३६ गुणांसह चौथ्या आणि नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता.