पश्चिम बंगाल; पोटनिवडणूक लढवणार ममता बॅनर्जी


कोलकाता – ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाने पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठेची विधानसभा निवडणूक जिंकली. ममता बॅनर्जी २ मे २०२१ रोजी लागलेल्या निवडणूक निकालात भाजपला रोखत तिसऱ्यांदा सत्तेत आल्या. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला असला, तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाचे तोंड पाहावे लागल्यामुळे सहा महिन्यात त्यांना विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. त्यांनी यासाठी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, यासाठी तृणमूल काँग्रेसचे भवानीपूरमधील आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिल्यामुळे ३० सप्टेंबर रोजी भवानीपूरमध्ये पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने आज दुपारी दिली आहे.

आयोगाने पोटनिवडणूकीबाबत म्हटले आहे की, 3 ऑक्टोबर मतमोजणी रोजी केली जाईल. तसेच ३० सप्टेंबरलाच पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि पिपली मध्येही पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवू शकतात. तसेच निवडणूक आयोगाने कोरोना परिस्थिती पाहता इतर ३१ जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

घटनात्मक आवश्यकता आणि पश्चिम बंगालच्या विशेष विनंतीचा विचार करून, विधानसभा मतदारसंघ १५९ -भवानीपूरसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत कठोर निकष लावले गेले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

त्याचबरोबर निवडणूक आयोग स्पष्ट केले की, संबंधित राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांचे मत आणि इनपुट लक्षात घेऊन इतर ३१ विधानसभा मतदारसंघ आणि ३ संसदीय मतदारसंघात पोटनिवडणूक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.