मंदा म्हात्रेंच्या भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया


जालना – भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप करत आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. मंदा म्हात्रे यांनी आपली ही खंत महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच एका कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. स्वतःचे कर्तृत्त्व सिद्ध करून सुद्धा पक्षाकडून डावलले जात असल्याचे म्हणत मंदा म्हात्रे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदा म्हात्रे यांच्या या नाराजीनानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागलेल्या असताना प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांना मंदा म्हात्रे यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले कि, मंदा म्हात्रे यांचे काय म्हणणे आहे, ते आम्ही ऐकून घेऊ. चंद्रकांत पाटील हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, मंदा म्हात्रे भाजपबाबत नाराजी व्यक्त करताना म्हणाल्या कि, भाजपमध्ये महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट असल्याचे म्हटले गेले. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. त्यावेळी मोदींची लाट नव्हती ना? ते माझे काम आणि कर्तृत्व होते. पण महिलांनी केलेले काम झाकून टाकायचे, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत, असे अनेक प्रकार भाजपमध्ये होतात.

यावेळी शिवसेनेवर देखील चंद्रकांत पाटील यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाजपची ताकद आता वाढली असून भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन यापुढे सर्व निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढवेल. पण मोदींच्या नावावर ज्यांनी मते मागितली आणि आमचा विश्वासघात केला, अशा विश्वासघातक्यांसोबत आम्हाला काम करायचे नसल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे. त्याचसोबत, आमच्यावर प्रेम करणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवून आणि जिंकून दाखवू, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट आणि मनसे-भाजप युतीच्या चर्चांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, मनसेसोबत युतीचा कोणताही विषय झालेला नाही. नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत अचानक भेट झाली होती.

सीबीआयला त्यांचे काम करू द्या, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई प्रकरणावर भाष्य केले आहे. पण, यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि जावयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावर कोणतेही भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला.