जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा समावेश


नवी दिल्ली – नुकतीच जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहिर करण्यात आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश झाला आहे. तर, या यादीत पहिल्या क्रमांकावर डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन आहे. हे सर्वेक्षण द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने केले होते. हे सर्वेक्षण जगभरातील ६० शहरांमध्ये करण्यात आले. ७६ निकषांची पुर्तता करण्याची अट सुरक्षित शहरे निवडण्यासाठी होती. डिजिटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि संबंधित शहरात माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होता.

या यादीत भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे नाव आहे. यामध्ये दिल्ली ६० पैकी ४८व्या क्रमांकावर तर मुंबई ५०व्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध ही दोन शहरे आहेत. मुंबई दिल्लीपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचे म्हटले जाते, तरीही दिल्ली वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत ५२.८ पॉइंट्ससह ४१व्या क्रमांकावर आहे. तर ४८.२ पॉइंट्ससह मुंबई ५०व्या क्रमांकावर आहे.

१०० पैकी ८२.४ पॉइंट्ससह डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन पहिल्या क्रमांकावर आहे. कोपेनहेगनने टोकियो आणि सिंगापूरसारख्या शहरांना मागे टाकत सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर कॅनडाची राजधानी टोरंटो आहे. टोरंटोला ८२.२ पॉइंट्स मिळाले आहेत. टोरंटो हे वैविध्यपूर्ण शहर असून तेथील जवळपास ३० लाख लोक १८० भाषा बोलतात. उन्हाळा आवडणाऱ्यांसाठी तर टोरंटो नंदनवन आहे.

सिंगापूर शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. शहराची दुसऱ्या क्रमांवरून तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सिंगापूर शहराला कोरोनाचा मोठा फटका बसला असला, तरी हे शहर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी चौथ्या क्रमांकावर आहे. सिडनीला ८०.१ पॉइंट्स मिळाले आहेत. सिडनी हे जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असून खाद्यप्रेमींसाठी पर्वणी आहे. तर पाचव्या क्रमांकावर जपानची राजधानी टोकियो आहे.