पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण


पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून पुण्यात महिला सरपंचाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात घडली आहे. सध्या सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. यावरुन भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला असून हे धक्कादायक चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारे असल्याचे म्हटले आहे.

पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.


हा व्हिडीओ चित्रा वाघ यांनी ट्वीट केला असून, गृहखाते ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकाऱ्यांना गलिच्छ शिवीगाळ करणे त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे महिला सरपंचाला मारहाण करणे याचे लायसन्स दिलयं का ??, अशी विचारणा केली आहे.


तसेच आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री महोदयजी हे धक्कादायक चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारे असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.