कोकाकोला पुन्हा संकटात?

काही काळापूर्वी फुटबॉल स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो याने कोका कोलाची बेइज्जती केल्याने कंपनीला प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्यातून थोडे सावरत असतानाच पुन्हा एकदा वेगळ्याच संकटाला सामोरे जाण्याची पाळी कंपनीवर आली असल्याचे समजते.

यावेळी कंपनीला अल्युमिनियम कॅनची प्रचंड टंचाई जाणवत आहे. कंपनीची डायट कोक, कोक झिरो ही उत्पादने प्रचंड लोकप्रिय आहेत आणि ती कॅन मधून विकली जातात. करोना मुळे विशेषतः ब्रिटन मध्ये मालवाहतूकीवर फारच विपरीत परिणाम झाला आहे. मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांची तेथे अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कंपनीला अल्युमिनियम कॅन्सचा पुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी या दोन्ही उत्पादनांची विक्री कमी करावी लागली आहे.

रोड हॉलेज असोसिएशनने १ लाख हेवी गुड्स ड्रायव्हर्सची कमतरता असल्याचे मान्य केले असून त्यामुळे मालवाहतूक करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ही समस्या आणखी वाढेल अशी चिन्हे दिसत आहेत. याचा थेट परिणाम कोका कोला कंपनीवर पडतो आहे.

काही दिवसांपूर्वी युरो कप प्रायोजक कोका कोला संदर्भात, क्रिस्तियानो रोनाल्डो याने पत्रकार परिषदेत आल्यावर टेबलवर ठेवलेल्या कोका कोलाच्या बाटल्या हटवून लोकांना पाणी प्या असे सुनावले होते. त्यामुळे कोका कोलाला एक दिवसात ४ अब्ज डॉलर्स म्हणजे २९३०० कोटी रुपये नुकसान सोसावे लागले होते.