देशातील या जिल्हा प्रशासनाने लढवली नामी शक्कल! दारू हवी असेल तर लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य


तामिळनाडू – तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हावे, याकरिता एक नामी शक्कल लढवली आहे. दारू सरकारी TASMAC आउटलेटमधून खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आता कोरोना प्रतिबंधक लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच, आता ग्राहकांना दारू खरेदीसाठी आपले दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ही कारवाई म्हणजे सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या मोहिमेचा एक भाग असल्याचे जिल्हाधिकारी दिव्या यांनी सांगितले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस जिल्ह्यातील जवळजवळ ९७% लोकसंख्येला देण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी दिव्या पुढे म्हणाल्या की, आता प्रशासनाला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लसीचा दुसरा देखील डोस देऊन ही लसीकरण मोहीम पूर्ण करायची आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला ही नवी कल्पना सुचली आहे. दरम्यान, लसीकरण प्रमाणपत्रांव्यतिरिक्त ग्राहकांना TASMAC आउटलेटमधून दारू खरेदी करण्यासाठी त्यांचे आधार कार्ड सादर करणे देखील अनिवार्य असणार आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देशात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वर्तविण्यात आला आहे. त्यातच, हा काळ अनेक सण-उत्सवांचा असल्यामुळे, केंद्र सरकारने, नागरिकांना मोठ्या संख्येने एकत्र जमण्यास मनाई केली आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव म्हणाले कि, एखाद्या सण-उत्सवात अथवा मेळाव्यात, जर तुम्हाला उपस्थित राहायचे असेल तर तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण करणे आवश्यक आहे.

याबाबत इशारा देताना नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल हे देखील म्हणाले कि, “जर आपण आता थोडीशी जरी चूक केली तरी सध्या नियंत्रणात असलेला संसर्ग पुन्हा भयावह रूप धारण करू शकतो. यामुळे, आपले सगळे कष्ट व्यर्थ जातील.

तसेच डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, जर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि मास्क वापरा. कोरोना संपला असे समजू नका. मास्क वापरणे सोडून देण्याची वेळ अद्याप आलेली नाही. सध्याच्या संक्रमणाच्या काळात तुम्ही सर्वांनी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सर्व सण साधेपणाने घरातच साजरे केले, तर खूप योग्य होईल. संसर्गाची गती मंदावली आहे. परंतु आपली जराशा निष्काळजीपणामुळे ती पुन्हा वाढू शकते. याचसोबत कोरोना व्हायरसच्या म्यूटेशनबाबत इशारा देताना डॉ पॉल म्हणाले की, विषाणू जेव्हा जेव्हा बदलतो म्हणजे म्यूटेट होतो तेव्हा तो संपूर्ण यंत्रणा हादरवून टाकतो.