काश्मिरामधील मुस्लिमांसंदर्भात तालिबानच्या प्रवक्त्याचे मोठे वक्तव्य


काबुल : तालिबानने काहीच दिवसांपूर्वी आम्हाला भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता तालिबानच्या प्रवक्त्याने काश्मिरातील मुस्लिमांसाठी आपल्याला आवाज उठवण्याचा हक्क असल्याचे सांगितल्यामुळे तालिबान्यांच्या आडाने पाकिस्तान काश्मिरातील फुटीरतावादी गटाला उसकवणार आणि भारतातील दहशतवादी कारवायांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

झुम कॉलच्या माध्यमातून बीबीसीला तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने एक मुलाखत दिली. तो या मुलाखतीत म्हणाला की, भारतातील जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम असतील वा इतर देशांतील मुस्लिम असतील, धर्माच्या आधारे त्यांच्यासाठी आवाज उठवण्याचा तालिबानला पूर्ण हक्क आहे. काश्मिरातील मुस्लिमांच्या हक्कांसाठी आम्ही आवाज उठवू आणि भारताला सांगू की मुस्लिम हे तुमचेच नागरिक आहेत, त्यांना समान अधिकार मिळाला पाहिजे.

2019 साली केंद्र सरकारने कलम 370 रद्द करुन जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला होता. तेव्हापासून त्या राज्यातील सरकार बरखास्त करुन तेथील प्रशासन केंद्राने आपल्या हाती घेतले आहे. या मुद्द्यावरुन काश्मीरमधील लोकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली असून त्याचा फायदा पाकिस्तान घेण्याच्या तयारीत आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबानी दहशतवाद्यांच्या मदतीने पाकिस्तान भारतातील दहशतवादी कारवायांत वाढ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.