यंदाही मंदिरामध्येच होणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा गणेशोत्सव


पुणे – श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. तर ऑनलाईन दर्शन सुविधासह ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भाविकांना घरबसल्या बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे देखील उपस्थित होते.

अशोक गोडसे यावेळी म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही यंदा ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यंदाच्या उत्सवाचे हे प्रमुख वैशिष्टय असणार आहे. यामुळे आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा अनुभव व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येणार आहे. त्याबाबत आम्ही लिंक देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, मंदिर शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे बंद ठेवण्यात आल्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश मिळत नाही. तसेच उत्सवाच्या काळात ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते देखील मंदिरात जाणार नसल्याचा निर्णय ट्रस्टने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई गणेशोत्सवात करण्यात येणार आहे. तसेच बाप्पाच्या चरणी दररोज २१ किलो वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईसह मिष्टांनांचा भोग अर्पण केला जाणार आहे. तसेच दररोज वेगवेगळे महाउपरणे देखील घालण्यात येणार आहे. अष्टविनायकांची मयुरेश्वर, सिद्धीविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर, महागणपती ही ८ नावे, दगडूशेठ आणि गणाधिश अशी १० उपरणी तयार करण्यात आली आहे. यातील एक उपरणे दररोज बाप्पाना घालण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.