DCGI ची 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीसाठी मंजुरी


नवी दिल्ली : बायोलॉजिकल ई कंपनीच्या 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी असलेल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी द ड्रग्ड कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) बुधवारी मंजुरी दिली आहे. या कंपनीकडून निर्मीण करण्यात येणारी ही लस स्वदेशी लस असून याच्या पुढच्या टप्प्याच्या चाचणीला काही अटींच्या आधारे मंजुरी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी बायोलॉजिकल ई कंपनीची ही लस असणार आहे. हैदराबादच्या कंपनीकडून या लसीची निर्मिती करण्यात येत असून त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी मिळाली आहे. देशभरातील 10 ठिकाणी या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्यात येणार आहे. कोविड 19 सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीच्या शिफारशीवरून DCGI ने या चाचणीला मंजुरी दिली आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे झायडस कॅडिला कंपनीने कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. कंपनीने असे म्हटले आहे की कोविड -19 लससाठी आतापर्यंत भारतातील 50 हून अधिक केंद्रांमध्ये क्लिनिकल ट्रायल केले आहे. या लसीला मंजुरी मिळाली, तर यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देखील लाभ होईल. इंजेक्शनच्या मदतीशिवाय फार्माजेट तंत्रज्ञानाद्वारे ही लस दिली जाईल. या तंत्राचा वापर केल्यास लसीनंतर दुष्परिणाम होण्याचा धोका कमी होईल. या लसीला मंजुरी मिळाली, तर कोरोनाला रोखण्यासाठी ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस असेल आणि देशातील पाचवी उपलब्ध लस असेल.

दरम्यान भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या 2 ते 18 वयोगटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीच्या 2 ते 17 वयोगटातील मुलांवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी जूनमध्ये परवानगी देण्यात आली आहे.