मुख्यमंत्र्यांच्या राज्यपाल भेटीवरुन सुधीर मुनगंटीवारांनी साधला निशाणा


मुंबई – भाजपकडून ठाकरे सरकारवर राज्यातील मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी, अशा मुद्यांवरून अगोदरच टीका केली जात असताना, यामध्ये आता आणखी एका जुन्याच मुद्द्याची नव्याने भर पडल्याचे दिसत आहे. ते म्हणजे विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा. कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी काल स्वत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची देखील उपस्थिती होती. आता यावरून पुन्हा एकदा भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या भेटीवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टिप्पणी केली आहे.

राज्याचे दोन दिवसांचे अधिवेशन होते. कधी सुरू झाले आणि कधी संपले, असे स्वप्नात असल्यासारखे अधिवेशन संपत आहे. कारण कोरोनाने सांगितले आहे, की आमचा हल्ला मंदिर आणि लोकशाहीचे मंदिर. आम्ही या दोनच मंदिरांवर हल्ला करणार असल्यामुळे मंदिरे आम्ही बंद ठेवतो आणि लोकशाहीचे मंदिर बंद ठेवतो. आम्ही बाकी सगळे सुरू ठेवतो कारण, कोरोना सांगतो की बिअर बारमध्ये आम्ही हल्ला करणार नाही. आमच्याकडे काही नवीन संशोधक आले आहेत. तर, राज्यपालांकडे १२ आमदारांसाठी मुख्यमंत्री आता गेले असतील, तर ते राज्याचे दुर्भाग्य असल्याचे टीव्ही-9 शी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेवरील नियुक्त्या लवकर कराव्यात अशी विनंती केली असता, या प्रश्नावर योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावरून राज्यपाल विधान परिषदेवरील नियुक्त्या लगेचच करणार नाहीत हेच सूचित होते. तर, राज्य सरकारकडून मंदिर उघडण्यास परवानगी दिली जात नसल्याबद्दलही सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केल्याचे दिसून आले. मंदिरांच्या मुद्यावरून भाजप व मनेसने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर सोमवारी राज्यभरात भाजपकडून यासाठी शंखनाद आंदोलन देखील केले गेले.