अमेरिकेचे सैन्य माघारी परतल्यानंतर तालिबान्यांचा चिनूक हेलिकॉप्टरवर ताबा


काबूल – अफगाणिस्तानातून अमेरिकेन सैन्याची शेवटची तुकडी माघारी परतल्यानंतर तालिबानने पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. तालिबानने २० वर्षानंतर अफगाणिस्तानात पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित केली आहे. अमेरिकेचे माघारी परतताच तालिबानने काबूल विमानतळावर ताबा मिळवला. तसेच अमेरिकन सैन्याने सोडलेली विमाने आणि चिनूक हेलिकॉप्टर ताब्यात घेतली आहेत.

यापूर्वी १५ ऑगस्टला तालिबानने काबूलवर ताबा मिळवताच अफगाण सैन्याची शस्त्रे आणि उपकरणे जप्त केली होती. २००३ पासून अमेरिकने अफगाण सैन्याला ६,००,००० शस्त्रे पुरवली होती. त्यात एम-१६ असॉल्ट रायफल, १,६२,००० दळणवळण उपकरणे आणि १६ हजार नाईट व्हिजन गॉगलचा समावेश आहे.

गणवेशात विमानतळावर तालिबानची हल्लेखोर पोहोचले आणि तेथील पाहणी केली. यावेळी बॉडी आर्मर, नाईट व्हिजन गॉगल आणि बंदुकांसह सज्ज होते. त्यानंतर अमेरिकन सैन्याच्या चिनूक हेलिकॉप्टरची त्यांनी पाहणी केली. याबाबतचा एक व्हिडिओ पत्रकाराने ट्विटरवर शेअर केला आहे.

दुसरीकडे अनेक हेलिकॉप्टर आणि चिलखती वाहने अमेरिकन लष्कराने काबूल विमानतळावर पोहोचण्यापूर्वी निकामी केल्याचे सांगितले जात आहे. काबूल विमानतळावर असलेली ७३ विमाने सैन्यविरहित करण्यात आली होती. तसेच ती विमानं निरुपयोगी ठरवल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुखे जनरल केंथ मॅकेन्झी यांनी सांगितले आहे. केंथ मॅकन्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी (अमेरिकन वेळेप्रमाणे) अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तानमधून उड्डाण केले.

मी अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य पूर्णपणे मागे घेण्यात आल्याची घोषणा करतो. अमेरिकन नागरिक आणि अफगाणिस्तानी लोकांना वाचवण्यासाठी अमेरिकन लष्कराने सुरु केलेले मदतकार्य पूर्ण झाले आहे. अमेरिकेच्या शेवटच्या सी -१७ विमान हे हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी उड्डाण केल्याचे मॅकन्झी म्हणाले.