केबीसीमध्ये भाग घेतला म्हणून रेल्वे अधिकाऱ्याची तीन वर्षांसाठी रोखली वेतनवाढ


छोट्या पडद्यावरील बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला शो ‘कौन बनेगा करोडपती १३’ सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये काही दिवसांपूर्वी हॉट सीटवर रेल्वे अधिकारी देशबंधू पांडे बसले होते. शो मध्ये ते सहभागी झाल्यानंतर अतिशय आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. पण त्यांना घरी गेल्यानंतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे.

रेल्वे प्रशासनाने राजस्थानच्या कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक विभागाचे कार्यालय अधीक्षक म्हणून तैनात असलेल्या देशबंधू पांडे यांना चार्जशीट दिली असून तीन वर्षांसाठी त्यांच्या वेतनवाढीवर बंदीही घातली आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कोणतीही माहिती न देता गायब होणे आणि केबीसीमध्ये सहभागी होत असल्याची पूर्व माहिती दिली नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रजा मंजूर झाल्याशिवाय देशबंधू हे ९ ते १३ ऑगस्टपर्यंत बेपत्ता होते आणि त्यांचे असे वागणे कामाकडे दुर्लक्ष करण्यासारखे असल्याचे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

केबीसीमध्ये बुद्धिमत्तेच्या जोरावर देशबंधू यांनी ३ लाख २० हजार रुपये एवढी रक्कम जिंकली. एकीकडे त्यांनी केबीसीमध्ये चांगला खेळ खेळला म्हणून त्यांचे सर्वजण कौतुक करत होते, तर दुसरीकडे मुंबईहून परत येताच रेल्वे प्रशासनाने त्यांना चार्जशीट दिली आहे. पुढील ३ वर्षे त्यांच्या वेतन वाढीवर बंदीही घालण्यात आली आहे. देशबंधू पांडे सहभागी झालेले एपिसोड २६ आणि २७ ऑगस्ट रोजी प्रसारित झाला आहे. त्यांनी केबीसीमध्ये १० प्रश्नांची योग्य उत्तरे दिली.

या प्रकरणी अद्याप देशबंधू पांडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवशी ते केबीसीमध्ये पोहोचले होते. कर्मचारी संघटनांनी रेल्वे प्रशासनाद्वारे केल्या जाणाऱ्या या कारवाईला विरोध केला आहे. पश्चिम मध्य रेल्वे मजदूर संघाचे विभागीय सचिव खालिद यांनी म्हटले आहे की, रेल्वे प्रशासन पांडे यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे आणि त्यांच्याविरोधात खटला लढला जाईल.