पॅरालिम्पिक स्पर्धेच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये अवनी लेखराने जिंकले सुवर्णपदक


टोकियो : भारताची नेमबाज अवनी लेखरा हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. अवनी लेखराने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. दरम्यान, क्वॉलिफिकेश राउंडमध्ये अवनी लेखराने सातवे स्थान पटकावले होते. त्याचबरोबर आणखी एक इतिहास अवनीने रचला आहे. अवनी ही पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

या इव्हेंटच्या क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये अवनी सातव्या स्थानी होती. तिने अंतिम सामन्यात धमाकेदार खेळी करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. त्याचबरोबर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे तिसरे पदक निश्चित झाले आहे. तत्पूर्वी उंच उडीमध्ये निषाद कुमारने आणि टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलने रौप्य पदकाची कमाई केली होती. थाळीफेकमध्ये भारताचा आणखी एक पॅरा अॅथलिट्स विनोद कुमार याने F52 कॅटेगरीमध्ये कांस्यपदक कमावले आहे, परंतु हा निकाल अद्याप होल्डवर ठेवण्यात आले आहे.

अवनी आणि चिनी अॅथलिट्स सी झांग यांच्यात नऊ राऊंडच्या या अंतिम सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये झांगने सर्वात अव्वल स्थान पटकावल्यामुळे या सामन्यात सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार म्हणून झांगकडे पाहिले जात होते. दरम्यान, अवनीने अचूक वेध साधत झांगचे आव्हान संपुष्टात आणले आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.