आता अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या पूर्ण करा अकरावी प्रवेशाची प्रक्रिया


मुंबई – राज्य शिक्षण मंडळाकडून अकरावीला प्रवेशासाठी होणारा गोंधळ आणि किचकट प्रक्रिया सोडवण्यासाठी एका मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. आता POEAM अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या अ‍ॅपचा उपयोग कोरोनाचा धोका आणि महाविद्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी होणार आहे. हे अ‍ॅप विद्यार्थ्यांना गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.


दरम्यान, शुक्रवारी अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रवेश यादी जाहीर झाली असून पहिल्या फेरीत १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले आहे. दहावीचा निकाल आणि गुणही वाढले असले तरी मुंबई महानगर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) मात्र फारशी वाढ झालेली नाही. अनेक महाविद्यालयांतील पात्रता गुण गेल्यावर्षीपेक्षाही घटल्याचे दिसत आहे.

१ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांचे केंद्रीय प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण १ लाख ९७ हजार १७१ जागांसाठी आले अर्ज होते. पहिल्या यादीत त्यापैकी १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांची वर्णी लागली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय ४८ हजार ७८८ विद्यार्थ्यांना मिळाले आहे. तर १८ हजार ८०४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि १२ हजार ७९९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. दुसऱ्या पसंती क्रमापासून खालील पसंती क्रमाची महाविद्यालये मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे संबधित वेळापत्रकानुसार प्रवेश निश्चित करायचा आहे.