राणे बंधुंसह भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल


सिंधुदुर्गनगरी – कालपासून पुन्हा एकदा नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. राणे यांच्या समर्थकांनी या यात्रेदरम्यान कणकवली येथील सभेत मोठी गर्दी केली होती. यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन झाल्यामुळे भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवसेना आमदार वैभव नाईक, भाजप आमदार नितेश राणे, निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर कोरोना निर्बंधांच्या काळात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कणकवलीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी राणे यांचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यातच शहरातील नरडवे नाका येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातही शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी याबाबत पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक कन्हैया पारकर, रिमेश चव्हाण, शैलेश भोगले, भूषण परुळेकर, सचिन सावंत, महेश कांदळकर, भाई कासवकर, यकिन खोत, राजू राठोड तसंच इतर १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर भाजप आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, संतोष कानडे, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, सुरेंद्र कोदे, शिशीर परुळेकर व आदी ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती माहिती कणकवली पोलिसांनी दिली.