राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अमोल कोल्हेंकडून निषेध


पुणे – देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राजमाता जिजाऊ, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळांच्या माध्यमातून बालशिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक बनले, असा दावा केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला असून हे वक्तव्य धक्कादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निषेध केला आहे. रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले. ऐतिहासिक कागदपत्रांचा जर धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. शहाजी महाराजांना आदिलशाहीच्या दरबारात त्याचा त्रास तर होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर १६७१ च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते, असे कोल्हे यांनी सांगितले.

चुकीच्या ऐकीव माहितीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर आपला जाज्वल्य इतिहास हा निःपक्षपातीपणाने, तर्कसंगत पद्धतीने, अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून राज्य, देश आणि जगभरात सांगण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

एका हिंदी दिग्दर्शकाने दोन दिवसांपूर्वीच मुघल शासक हे राष्ट्रनिर्माते असल्याचे असे सांगितले. त्यामुळे हा इतिहास सांगण्याची गरज आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. केवळ निषेध किंवा एखादे आंदोलन हे क्षणिक ठरू शकते. मला वाटते ही वैचारिक लढाई आहे आणि ती त्याच माध्यमातून लढली गेली पाहिजे. साहित्य, कला याचा समाजमनावर दीर्घकालीन परिणाम होतो, त्या माध्यमातून आपण निःपक्षपाती, तर्कसंगत इतिहास जगभर पोहोचवला पाहिजे, असेही अमोल कोल्हे म्हणाले.