काबूल विमानतळावर एका पाण्याच्या बाटलीसाठी तब्बल 3 हजार रुपये, जेवणाच्या एका थाळीसाठी मोजावे लागत आहेत 7500रुपये!


काबूल – तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थीत बिकट होत चालली आहे. अमेरिकन सैन्याच्या अफगाणिस्तानातून वापसीची तारीख जसजशी जवळ येत आहे. तशी तिथे अडकलेल्या लोकांच्या चिंतेत वाढ होत आहे. त्यातच काबूल विमानतळावर गोंधळाचे वातावरण आहे. तेथील महागाई गेल्या काही दिवसात उच्चांक गाठत असल्याचे चित्र आहे.

तेथे खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडल्याचे चित्र आहे. त्यातच आता तेथे तब्बल ४० डॉलर्स म्हणजेच ३ हजार रुपये काबुल एअरपोर्टवर पाण्याच्या एका बाटलीसाठी मोजावे लागत आहेत. तर एक प्लेट राइससाठी १०० डॉलर्स म्हणजे जवळपास साडे सात हजार द्यावे लागत आहेत. विशेष म्हणजे यासाठीचे पैसे विमानतळावर डॉलर्समध्येच घेतले जात आहेत. महागाईमुळे अफगाणिस्तानातील सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अफगाणिस्तानात नागरिक चलनाला अफगाणी म्हणतात. सध्या अफगाणिस्ताना एका डॉलर्सची किंमत ८६ अफगाणी आहे. भारतीय १ रुपयासाठी १.१६ अफगाणी मिळतात. म्हणजेच भारतीय चलनाचे मूल्य १६ पैसे अधिक आहे.

काबूल विमानतळाला तालिबान्यांनी चारही बाजूने घेराव घातला असून सर्व ठिकाणी तालिबानने नाकाबंदी केली आहे. त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी विमानतळावर होत आहे. तालिबान समर्थक तिथेही नागरिकांना त्रास देत आहेत. वर्ल्ड फूड प्रोग्रामने जारी केलेल्या अहवालानुसार अफगाणिस्तानातील स्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे. त्यानुसार तीन पैकी एक अफगाणी नागरिक उपाशी असल्याचे या अहवाला नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच १.४ कोटी नागरिकांची उपासमार होत आहे. यात २० लाख मुले कुपोषणाने ग्रस्त आहेत. त्यांना मदतीची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या अफगाणिस्तान पिक नाही, पाऊस नाही, पिण्याचे पाणी नसल्यामुळे तेथील संकट आणखी गहिरे होत चालले आहे.

अफगाणिस्तानात खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमतीत एवढी वाढ झाली आहे की, लोकांना उपाशी पोटी विमानतळावर रहावे लागत आहे. अनेक जण चक्कर येऊन पडत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण लोकांची मदत करण्याऐवजी त्यांच्यासोबत तालिबानी मारहाण करत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानातील नागरिकांच्या मदतीसाठी अमेरिका आणि नाटो देशाचे सैनिक पुढाकार घेत आहेत. लोकांना पाण्याच्या बाटल्या आणि जेवण उपलब्ध करून देत आहेत.