रुटीन चेकअपसाठी नारायण राणे ‘लिलावती’मध्ये दाखल


मुंबई – नारायणे राणे व शिवसेना असा सध्या राज्यात चर्चेत असलेला वाद आता हळूहळू थंड होण्याची चिन्हे दिसू लागली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन झालेल्या या वादामुळे राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थांबली होती. पण ती आता लवकरच पुन्हा सुरू होत आहे. राणे यांनी त्याआधी आज आपल्या वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात हजेरी लावली. हे रुटीन चेकअप राज्यभरात होणाऱ्या या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी करण्यात येत आहे. राणे यांना रुग्णालयात अॅडमिट केले नसल्याची माहिती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.

१९ ऑगस्टला मुंबईतून नारायण राणेंनी जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार आहे. पण नारायण राणेंनी रायगडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लगावेन असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजपा आमने-सामने आले आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते.

सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात केले होते. या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता.

दरम्यान उद्यापासून महाराष्ट्रातील अर्धवट राहिलेली त्यांची ‘जन आशीर्वाद यात्रा’ नारायण राणे पुन्हा सुरू करणार आहेत. राणेंनी गेल्या दोन दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी सिंधुदुर्गमधून पुन्हा यात्रेला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राणे यांच्या दौऱ्याचा मार्ग पूर्वी होता तोच असणार आहे.