तामिळनाडू भाजप सचिव राघवन यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजीनामा


चेन्नई – आपल्या सचिव पदाचा तामिळनाडूमधील भाजप नेते के. टी राघवन यांनी राजीनामा दिला आहे.युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तामिळनाडूतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या राघवन यांनी राजीनामा दिला आहे. महिलांसोबत राघवन यांनी चुकीच्या पद्धतीने वर्तन केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत असून भाजपच्या सदस्यांनीच हा व्हिडीओ जारी केला होता. पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांबरोबर शर्टलेस होऊन व्हिडीओ चॅट करताना दिसत आहे.

मंगळवारी सकाळी हा व्हिडिओ मदन रविचंद्रन यांनी अपलोड केला आहे असून राघवन यांचे असे जवळपास १५ व्हिडिओ त्यांच्याकडे असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष के अन्नामलई यांच्या सल्लामसलत करून हा व्हिडिओ रिलीज करण्याचा निर्णय घेतला. अन्नामलई यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यास व्हिडिओ रिलीज करण्यास सांगितल्याचा दावा रविचंद्रन यांनी केला आहे.

राघवन यांनी व्हिडिओ समोर आल्यानंतर लगेच राजीनामा दिला आहे. गेल्या तीन दशकांपासून मी पक्षासाठी निस्वार्थपणे काम करत आहे. माझी आणि पक्षाची प्रतीमा मलिन करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असल्याचे म्हणत राघवन यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

दरम्यान, अन्नामलई यांनी याप्रकरणी सांगितले की, पक्षांतर्गत समिती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आली आहे. तसेच व्हिडिओ खरा आहे की नाही, याचा तपास देखील सुरू आहे. अन्नामलईंच्या परवानगीने व्हिडिओ रिलीज केल्याचे रविचंद्रन यांनी म्हटले आहे. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना व्हिडिओ रिलीज करण्यास मी सांगितले. पण, व्हिडिओची विश्वासार्हता तपासण्यापूर्वी पक्षाकडून राघवन यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये आणि कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येऊ नये, असं म्हटले होते.