येडियुरप्पांना राज्यभरात फिरण्यासाठी एक कोटींची एसयुव्ही कार


बंगळुरु – पाच दिवसांच्या मालदीव व्हेकेशनहून परतल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना जवळजवळ एक कोटी रुपयांची टोयोटा हायब्रिड कार मिळाली आहे. २०२३च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही नवीन टोयोटा वेलफायर कार येडियुरप्पा राज्याचा दौरा करण्यासाठी वापरणार असल्याची माहिती मिळत आहे.

सोमवारी मालदीवहून येडियुरप्पा परत आले, तेव्हा त्यांना घरी नेण्यासाठी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक नवीन पांढरी टोयोटा वेलफायर कार थांबली होती. २६ जुलै रोजी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाले आहेत. आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी येडियुरप्पा राज्यभरात दौरे करण्यासाठी प्रवासासाठी या कारचा वापर करतील, असे म्हटले जाते.

मैत्री मोटर्सच्या नावाने या नवीन पेट्रोल/हायब्रिड टोयोटा वेलफायर कारची नोंदणी आहे. मैत्री मोटर्स हा ऑटोमोबाईल सेल्स बिझनेस शिवमोगा जिल्ह्यात येडीयुरप्पा यांच्या कुटुंबांचा आहे. अधिकृत आरटीओ रेकॉर्डनुसार, येडियुरप्पा आणि त्यांचे कुटुंब मालदीवला सुट्टीवर जाण्याच्या दोन दिवसाआधी १६ ऑगस्टला दक्षिण बेंगळुरू आरटीओमध्ये कारची नोंदणी झाली होती.

येडियुरप्पा २०१६ मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या पक्षाचे सहकारी मुरुगेश निरानी यांनी १.१६ कोटी रुपयांची टोयोटा लँड क्रूझर भेट दिल्यानंतर ते वादात सापडले होते. राज्यभर येडियुरप्पा यांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी ही कार भेट दिल्याचे निरानी यांनी सांगितले होते. दरम्यान, वाद वाढल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी ती कार निरानी यांना परत केली.

मुख्यमंत्री असताना येडियुरप्पा राज्य सरकारने पुरवलेली हाय-एंड कार वापरत होते. त्यांनी २६ जुलैला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी संपत्ती गोळा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा गैरवापर केल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते. त्यामुळे थोडी कुजबूज सुरू असतानाच येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने भाजपचा जीव भांड्यात पडला होता.