देशाबाहेर अफगाणी नागरिकांना जाऊ देणार नाही


काबूल – सध्या जगभरासाठी अफगाणिस्तानातली परिस्थिती चिंतेचा विषय ठरली आहे. अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आता अफगाणिस्तानचे भविष्य काय? असा प्रश्न जगापुढे आहे. अशातच दररोज वेगवेगळे आदेश, फतवे काढत तालिबानी आहेत. त्यावरुन या प्रश्नाची गंभीरता अधोरेखित होत आहे. तालिबान्यांनी आताही एक नवी घोषणा दिली आहे.

मंगळवारी एक पत्रकार परिषद तालिबान्यांनी घेतली. यावेळी बोलताना तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिदने सांगितले की, अफगाण नागरिकांना यापुढे आता देशाबाहेर जाता येणार नाही. बचावकार्यासाठी वापरण्यात येणारी विमाने जिथे उतरत आहेत, त्या काबूल विमानतळावर आता अफगाण नागरिकांना जाऊ दिले जाणार नाही.

सीएनएनने याबद्दल दिलेल्या बातमीमध्ये सांगितले आहे की, अफगाण नागरिकांसाठी या विमानतळाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. पण ह्या रस्त्याने इतर देशातील नागरिक जाऊ शकतात आणि आपापल्या देशाच्या विमानांनी आपल्या देशातही जाऊ शकतात, अशी माहिती तालिबान्यांकडून देण्यात आली.

अफगाण नागरिक बाहेर जाऊ लागल्याने आम्हीही नाखूश आहोत. येथील डॉक्टरांनी तसेच शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासकांनी देश सोडून जाऊ नये. त्यांनी येथेच राहून आपापल्या क्षेत्रात काम करावे, असे तालिबानने सांगितले आहे.