मुंबई : जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष, सदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणुकीकरिता राज्य शासनास शिफारस करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती डॉ. शालिनी शशांक फणसाळकर-जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षासाठी निवड समिती गठित करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे.
राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित
23 जुलै 2021 रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 च्या नियम 90 (1) मधील तरतुदीनुसार ही निवड समिती गठित करण्यात आलेली आहे. सदर समितीवर अध्यक्षपदी डॉ. फणसाळकर-जोशी तर सदस्य म्हणून अनिरुद्ध पुरुषोत्तम पाटील, गजानन नामदेव मुंढे, निर्मला सामंत-प्रभावळकर, विकास रावजी सावंत, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई आणि महिला व बाल विकास आयुक्त, पुणे असे एकूण 6 सदस्य आहेत. समिती बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 (2016 चा 2) मधील तरतुदीनुसार जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष, सदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणुकीकरिता राज्य शासनास शिफारस करणार आहे.