Infosys चे सीईओ सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाचे समन्स


नवी दिल्ली: आयकर विभागाने करदात्यांना कर भरण्यास अधिक सोपे जावे, यासाठी नवीन वेबसाइट सुरू केल्यानंतर या वेबसाइटमध्ये अनेकविध तांत्रिक अडचणी असल्याचे समोर आले. आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसकडे आयकर विभागाच्या नवीन वेबसाईटचे काम आहे. पण, इन्फोसिसकडून अद्यापही तांत्रिक अडचणी दूर करण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने या पार्श्वभूमीवर देशातील मोठी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांना समन्स जारी केले आहे.

आयकर विभागाची नवीन ई-फायलिंग पोर्टल सेवा गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू झाली आहे. पण, त्यातील तांत्रिक दोष अद्यापही दूर झालेले नाहीत. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी २३ ऑगस्ट २०२१ रोजी स्पष्टीकरण द्यावे, असे समन्स बजावण्यात आले आहे.

अनेक समस्या आयकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलमध्ये येत आहेत. आयकर रिटर्न्स भरणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ते करदात्यांची समस्या समजून घ्या. आयकर विभागाच्या या ई-फाईलिंग पोर्टलचे काम सुरळीत होत नसल्यामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे.