एवढ्या कोटींना विकले गेले नागराज मंजूळेंच्या ‘झुंड’चे ओटीटी राइट्स


सिनेचाहते मेगास्टार अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण या चित्रपटाच्या थिएटर रिलीजवर अद्यापही सस्पेन्स कायम आहे. दरम्यान 33 कोटींना चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकल्याची माहिती आहे. असे मानले जात आहे की जर आणखी विलंब महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडण्यास झाला, तर कदाचित ‘झुंड’ हा अमिताभ यांचा दुसरा चित्रपट असेल, जो थेट ओटीटीवर रिलीज केला जाईल. याआधी अमिताभ यांचा ‘गुलाबो सिताबो’ ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता.

दरम्यान महाराष्ट्रातील चित्रपटगृहे अद्याप बंद आहेत, पण तेलंगणा व्यतिरिक्त, इतर राज्यांमधील चित्रपटगृहे 50% उपस्थितीसह खुली आहेत. महाराष्ट्रात चित्रपटांच्या कमाईसाठी रिलीज होणे जास्त महत्त्वाचे आहे. असे मानले जात आहे की चित्रपटाच्या एकूण कमाईपैकी सुमारे 25% कमाई महाराष्ट्रातूनच होते. बेल बॉटम आणि चेहरेच्या निर्मात्यांनी महाराष्ट्रातील कमाई सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि इतर राज्यातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केला आहे, परंतु ‘झुंड’ साठी ते शक्य नाही.

दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘झुंड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. महाराष्ट्राचे फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांचा हा बायोपिक आहे. हेच कारण आहे की चित्रपटाच्या 25% नाही तर त्यापेक्षा जास्त कमाई एकट्या महाराष्ट्रातून होऊ शकते. कथा, दिग्दर्शक आणि व्यावसायिक कोन हे सर्व लक्षात घेऊन हा चित्रपट महाराष्ट्राच्या प्रेक्षकांशिवाय देशाच्या इतर भागांमध्ये रिलीज करण्याचा कोणताही विशेष फायदा होणार नाही.

दरम्यान बरेच प्लस पॉइंट ‘झुंड’मध्ये आहेत, पण व्यावसायिक व्यवहार्यता देखील महत्त्वाची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी अंदाजे 20 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे ओटीटी अधिकार 33 कोटींना विकून व्यावसायिक धोका टाळला आहे.