या तीन देशातील सेन्सॉर बोर्डांनी ‘बेल बॉटम’ चित्रपटातील एका सीनवर घेतला आक्षेप


19 ऑगस्टला बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. प्रेक्षकांची मोठी पसंती या चित्रपटाला मिळताना दिसत आहे. पण तीन अरब देशांमध्ये अक्षयच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी चित्रपटातील एका दृश्यामुळे घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सौदी अरब, कुवेत आणि कतार या तीन देशांमध्ये अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या देशातील सेन्सॉर बोर्डांनी चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे. यामुळेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला या देशात परवानगी नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात तीनही देशांची प्रतिमा खराब दाखवण्यात आल्याचा दावा यूएई सेन्सॉर बोर्डाने करत चित्रपटावर बंदी घातली आहे. तसेच या चित्रपटात काही ऐतिहासिक घटनांमध्ये देखील बदल केल्याचा सेन्सॉर बोर्डाचा आरोप आहे. या चित्रपटात लाहोरहून विमानाचे अपहरण करून ते दुबईत आणले जाते आणि जिथे भारतीय अधिकारी एक सिक्रेट मिनश पूर्ण करतात, असे दाखवण्यात आले आहे.

तर यूएई सेन्सॉर बोर्डाच्या म्हणण्यानुसार या अपहरणकर्त्यांना संयुक्त अरब अमीरातच्या फोर्सने पकडले होते. तसेच यूएईच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांने या प्रकरणाची दखल घेतली होती, असे म्हटले जात आहे. पण चित्रपटात वेगळी स्थिती दाखवण्यात आल्याचे म्हणत या तीन देशात चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.